थालीपीठ | Thalipeeth

नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये!!
   आजची रेसिपी आहे थालीपीठ . सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्री च्या जेवणाला एखादी हेल्थी वन पॉट डिश बनवायची असेल तर तर थालीपीठ उत्तम आहेत. यासाठी ठराविक साहित्य असे काही नसून, थालीपीठाचे पीठ बनवले कि यात जे किचन मध्ये उपलब्ध आहे ते साहित्य टाकू शकतो.
यासाठी लागणारे बेसिक साहित्य आहे:
२ वाटी ज्वारीचे पीठ
पाव वाटी गव्हाचेपीठ
पाव वाटी बेसनपीठ
पाव वाटी भिजवलेले पोहे
प्रथम तिन्ही पीठ मिक्स करून घ्या. यात भिजवलेले पोहे टाका. पोहे टाकल्याने थालीपीठ खुसखुशीत होतात.
आता पिठात १ चमचा हळद आणि  २-३ चमचे तीळ टाका. थालीपीठात तीळ खूप छान लागतात.
मिक्सरच्या छोट्या भांड्यात ५-६ लसणाच्या पाकळ्या ,
३-४ हिरव्या मिरचीचे तुकडे,
१ चमचा जिरे
१ चमचा धणे
अर्धा चमचा ओवा
आणि मीठ टाका.
सर्व साहित्य पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचे आहे.
हे वाटण पिठात टाका.
आता यात एक मोठा कांदा आणि भरपूरशी कोथिंबीर बारीक चिरून टाका.
कांदा घातल्याने थालीपीठ पिठूळ लागत नाही व त्यात ओलसरपणा पण राहतो.
कोथिंबिरीमुळे  खमंग वास थालीपीठाला येतो.
   फक्त एवढे साहित्य वापरून जरी थालीपीठ केले तरी ते खूप छान आणि खमंग होते.
जर फ्रिज मध्ये एखादी पालेभाजी असेल, तर ती बारीक चिरून यात टाकता येते तसेच दुधी, असेल तर तो साल काढून किसून यात वापरता येतो.
शिवाय जर उरलेले भात किंवा भाजी असेल तर ती देखी यात घालू शकता.
भात टाकल्याने तर थालीपीठ खूप छान खुसखुशीत होतात. भाजीमुळे याला प्रत्येकवेळी वेगळी
चव लागते. पिठलं उरल असेल तर ते यात घालू शकता. अतिशय चविष्ट थालीपीठ होतात. घट्ट डाळ किंवा आमटी उरली असेल तर ती पण यात टाकता येते.
शिवाय थालीपीठ त   ओवा टाकल्यामुळे  हे सर्व पचनाला जड नाही होत.
लागेल तसे पाणी घालून पीठ भिजवा. हे पीठ खूप घट्ट अथवा खूप सैलसर नसावे. थालीपीठ थापताना पाणी वापरणार आहोत, हे लक्ष्यात घेऊन त्याप्रमाणे पीठ भिजवावे.
वेगवेगळ्या पद्धतीने थालीपीठ थापता येते.
तव्यात पेटंटचा गोळा ठेवून तो थापून थालीपीठ बनवता  येते. या पद्धतीने बनवलेले थालीपीठ थोडे जाडसर असते. त्याचप्रमाणे हाताला ताव पोळू नये यासाठी काळजी घ्यावी लागते.
दुसऱ्या पद्धतीत प्लास्टिक च्या पेपर ला अथवा अल्युमिनियम फॉईल ला तेल लावून थालीपीठ थापता येते.पण बऱ्याच वेळा थालीपीठ तव्यावर टाकताना पेपरवरून ते पूर्णपणे न निघून येता, पपेरला चिकटते.  यात प्लास्टिक तव्याला चिटकू  नये म्हणून देखील काळजी घ्यावी लागते.
तिसरी पद्धत म्हणजे ओल्या सुती कापडाचा वापर करून थालीपीठ थापू शकता. यावर पाहिजे तेवढे पातळ आणि मोठे थालीपीठ थापता येते. तसेच कापडाला थालीपीठ चिकटत नाही अथवा कापड तव्याला चिकटत नाही. तुम्ही अगदी नवशिके असला तरी थालीपीठ चुकणार नाही. त्यामुळे हि पद्धत अगदी उत्तम आहे. एखादा कॉटन चा रुमाल तुम्ही थालीपीठ बनवण्यासाठी खास किचन मध्ये ठेवू शकता.

 

 

   तर पोळपाटाच्या आकाराचा सुती कापड ओला करून घ्या. यावर पिठाचा मोठ्ठा गोळा ठेवा.हाताला पाणी लावून, बोटानी गोळा एकसारखा पसरावा. सुरवातीला गोळा थोडा थापून नंतर बोटानी काठ पुढे सरकवायचे आहेत. शेवटी मधला भाग दाबून एखासारखे थालीपीठ थापावे. मधून मधून पाण्याचा हात लावावा. मध्यभागी बोटानी होल पाडा. नंतर त्याभोवती, काठांच्या जवळ चार  होल पाडावेत. यात तेल सोडले की ते सर्व थालीपीठाला लागते आणि थालीपीठ जाड असूनही खुसखुशीत भाजली जातात.

 

 

    पूर्णपणे गरम झालेल्या तवावर कापडासहित थालीपीठ अलगद सोडा. कापड वरच्या बाजूला असले पाहिजे आणि थालीपीठ तव्याला चिटकले पाहिजे.अलगदपणे कापड काढून घ्या. ओले असल्यामुळे कापड लगेच सुटेल आणि गरम तव्याला थालीपीठ चिकटतील.आठ होलमध्ये तेल सोडा. झाकण घालून थालीपीठ मध्यम आचेवर वाफवून घ्या. थालपीठ थोडी जाड असल्यामुळे ती व्यवस्थित भाजली जावी याकरता झाकण घालावे. तेलेलामुळे तव्याकडचा भाग कुरकुरीत भाजला जाईल. २ मिनिटानंतर झाकण काढून दुसऱ्या बाजूने शेकून घ्या. २-३ थालीपीठानंतर कापडात पाणी कमी होते व पीठ चिकटते त्यामुळे २-३ थापीठानंतर कापड धुवून परत वापरावे.
गरम- गरम थालपीठावर लोण्याचा गोळा किंवा तूप घाला. दही किंवा लोणच्याबरोबर  थालपीठ मस्त लागतात.
संपूर्ण कृतीचा video :

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *