कढीपत्त्याची चटणी  | Curry Leaves Chutney

नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये!

आज एक वेगळ्या प्रकारची चटणी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.
ती म्हणजे कढीपत्त्याची चटणी. रोजच्या फोडणीत असणारा कढीपत्ता, भाजी किंवा पोहे खाताना शक्यतो बाजूला काढून टाकला जातो मग त्याची चटणी कशी लागेल? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.पण कढीपत्त्याची चटणी अतिशय स्वादिष्ट लागते. भाताबरोबर किंवा तोंडीलावणं म्हणून हि चटणी छान लागते.दह्यामध्ये कढीपत्त्याची चटणी घालून ती पोळी अथवा भाकरी सोबत खाऊ शकता.तसेच सुक्या भाज्यांना देखील हि चटणी वरून घालून तूच स्वाद वाढवू शकता. हि सुकी चटणी असून १५ दिवस चांगली राहते तसेच फ्रिज मध्ये ठेवल्यास अजून जास्त टिकते. कढीपत्ता आरोग्याच्या दृष्टितने विशेषतः केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता अतिशय उपयुक्त आहे. केस काळे राहावे आणि गळू नयेत म्हणून कढीपत्ता अतिशय गुणकारी आहे. चटणीच्या निमित्ताने कढीपत्ता खाण्यात येतो.

साहित्य:

भरपूरसा कढीपत्ता
तीळ
सुक खोबर
जिरे
लसूण
लाल तिखट

कृती:
१. प्रथम कढीपत्त्याची पानं काढून घ्यावीत. कढईत ३-४ चमचे तेल गरम करून त्यात हि पानं थोडी-थोडी करून तळून घ्यावीत. पानं चिवड्यासाठी तळतो तशी  कुरकुरीत तळली गेली पाहिजेत.
२. तव्यावर थोडेसे तेल गरम करून त्यावर हि कढीपत्त्याची पानं मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजली तरी चालतील.फक्त याला खूप वेळ लागतो त्यामुळे याठिकाणी मी पानं तळून घेतली आहेत.
३. आता तळलेली पानं टिश्यू पेपर वर निथळून घ्यावीत.यावर १ छोटा चमचा हिंग टाका.

४.उरलेल्या तेलात सुक्या खोबऱ्याचे काप तळून घ्यावेत. तुम्हाला जर कढीपत्ता अजिबातच आवडत नसेल तर खोबऱ्याचे प्रमाण चटणीत जास्त ठेवा.
५.  ४-५  लसणाच्या कुड्या तळून घ्याव्यात.तसेच जिरे आणि तीळ देखील तळून घ्यावेत.जिरे आणि तीळ भाजून घेतले तरी चालतील.
६ आता मिक्सर च्या छोट्या भांड्यात प्रथम जिरे-खोबर-लसूण बारीक करून घ्यावे. नंतर यात तळलेली पानं, तिखट आणि मीठ  टाकून फक्त १-२ वेळा मिक्सर फिरवून पानं खूप बारीक न वाटता ओबडधोबड वाटून घ्यावीत.
७. मिश्रण बाउल मध्ये काढून घ्या. यात तीळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार आहे कढीपत्त्याची खमंग चटणी.
संपूर्ण कृतीचा video :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *